सारसबागेत गणपतीला
घातला जेव्हा स्वेटर
फुटपाथवरचा ग़रीब म्हणे
मी काय मारले खेटर
बाप्पा तुझा जन्म मुळचा
बर्फामध्येच झाला
तरीसुद्धा भक्ताला त्या
तुझा पुळका आला
ठाऊक आहे मला
की माझं नशिब खोटं
नि स्वेटर घालणा-याचं पोट
तुझ्यासारखंच मोठं
मला वाटलं होत तुला
थंडी वाजत नाही
नि माझ्या भिका-याच्या भांड्यात
नाणं वाजत नाही
नोटाबंदीमुळे आता
नाणं सुद्धा मोठं
नि भीक देणा-याचं मन
झालं की रे छोटं
तुझ्यासाठी नेपाळ्याचा
स्वेटर विकला गेला
नि त्याच फुटपाथवरती
माझी जीव गारठून मेला
ज्याने तुला स्वेटर घातला
त्याचे करशील ना रे भले
माझ्या सारखे किती तरी
जरी गेले मेले
तुझी भक्ती म्हणजे काय
ती कधीच कळली नाही
आजवरती तुझी माझी
वीणच जुळली नाही
घरात स्वेटर घालुन संजय
रचेल यांवर काव्य
नि सोशल मिडियावर त्याचे
कौतुक होईल भव्य
मला याची सवय आहे
मी असाच जगतो आहे
नि अंगावरती उन्हं यायची
वाट बघतो आहे
डाॅ. संजय उपाध्ये