Thursday, June 4, 2009

कावळा आणि चिमणी

खालची कविता मुळ कथेला (जी आता नीट आठवतही नाही) थोडी कलाटनी देऊन लहान मुलांना आवडेल अशा स्वरुपात मांडायचा प्रयत्न केला आहे.

कावळा आणि चिमणी
राहायचे शेजारी
सुख होतं भरपूर
दोघांच्याही घरी

कावळ्याचं घर होतं शेणाचं
चिमणीचं घर होतं मेणाचं

एकदा काय झालं
खूप पाऊस आला
पुराच्या पाण्याने
गाव भरून गेला

कावळ्याचं घर गेलं वाहून
चिमणीकडे आला तो धावून

"चिमणे चिमणे दार उघड"
कावळा म्हणाला चिमणीला
"पिलू आहे छोटं, वेळ नाही मला"
चिमणी म्हणाली कावळ्याला

कावळा बिचारा गेला निघून
पावसाच्या पाण्यात राहिला भिजून

चिमणी मात्र होती
तिच्या पिलात व्यस्तं
पिलासवे तिचा
दिवस जाई मस्तं

दिवसां मागे दिवस गेले
चिमणीचे पिलू मोठे झाले

पिलाला उडायची
हौस होती भारी
उंच आकाशात
त्याने मारली भरारी

मोकळ्या आकाशी गेले ते उडून
चिमणीच्या घरट्यात, नाही आले परतून

चिमणीला पिलाची
यायची आठवण
पिलू मात्र करी
पैशांची पाठवण

चिमणी झाली होती खूप म्हातारी
म्हातारपणाने पडली आजारी

"आजारी आहे चिमणी"
असा पिलाला निरोप गेला
पण ऐन वेळी मदतीला
कावळाच धावून आला

पिलू होते दूर
त्याने केला फोन
औषधांसाठी म्हणे
पाठवतो पैसे दोन

चिमणी म्हणे पिलाला, पैसे नको...
माझी थोडीही काळजी करू नको

कावळ्याने चिमणीची केली सेवा
खायला तिच्यासाठी आणला मेवा

कावळ्याच्या मदतीने
चिमणी झाली बरी
त्याची तिने मागितली
माफी खरी खरी

कावळा म्हणाला विचार नको करू फार
घरासोबत जोडावे मित्रही चार!

कावळा अन् चिमणी आता
झाले मित्र पक्के
एकमेकांच्या मदतीने
काढले आयुष्य अख्खे!

-अनामिक
मूळ पान (Home Page) लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥