Friday, July 10, 2015

Marathi kavita: Bayko

बायको.....!
बायको नसेल तेव्हा
घराला त्राण नसतो..!
बायको हाच खरा
घराचा प्राण असतो..!!
तिचे अस्तित्व हवे असते
सकारात्मक खलबतांसाठी..!
बायको म्हणजे बंदर असते
नवरा नावाच्या गलबतासाठी..!!
संसारातील जिवनसाथीसाठी
शोधाशोध नात्यांच्या डेऱ्यांसवे..!
बायको नावाचा शाश्वत आधार
मिळतो सप्तपदीच्या फेऱ्यांसवे..!!
सर्वांच्या आनंदासाठी
ती साथ देणारी सावली असते..!
दुखऱ्या क्षणी सावरायला
बायको नावाची माउली असते..!!
गंध सुखाचा अनुभवणारा
घरात सर्वांचा ताफा असतो..!
कुटुंबात दरवळणारा
बायको नावाचा चाफा असतो..!!
कर्तव्याच्या करारावरची
ती न पुसणारी शाई असते..!
प्रत्येकाची आवड जपणारी
बायको नावाची घाई असते..!!
आजारपणात फणफणणाऱ्या
ती लेकरांसाठी धट्टी असते..!
कपाळावरील मिठाची
बायको नावाची पट्टी असते..!!
स्वयंपाक, धुणे,दळणकांडप
तिचे राब-राबणारे हात असतात..!
प्रसंगी शिळेपाके चावणारे
बायको नावाचे दात असतात..!!
सर्व दुःखांना स्वतःमध्ये
ती मळणारी उंडी असते..!
जन्म दिलेल्या फुलझाडांसाठी
बायको नावाची कुंडी असते..!!
बायको नसेल तेव्हा
घराला त्राण नसतो..!
बायको हाच खरा
घराचा प्राण असतो..!!