Sunday, March 20, 2011

घटना (Ghatana) - दॄष्टीकोन

घटना १ - सामान्य दॄष्टीकोन

स्थळ - अर्थातच ऑफिस

वेळ - चंद्र जांभया देत सूर्याला वर बोलावत झोपायच्या तयारीत आहे.

पार्श्वभूमी - तुम्ही नेहमीप्रमाणे असंख्य चुका केल्याने बॉसला वरून दट्ट्या मिळालाय. तोच दट्ट्या आता बॉस तुमच्याकडे घेऊन येतोय.


बॉस - काय हा मूर्खपणा???
तुम्ही - क क क काय झालं सर...
बॉस - काय झालं म्हणून काय विचारतोस? डोक्यात मेंदू आहे की गुंतवळ?
तुम्ही -माझं काही चुकलं का?
बॉस - नाही, तुला नोकरी दिली हेच चुकलं माझं. अरे हे हे असं प्रेझेंटेशन कुणी लिहिलं होतं का?
तुम्ही - मी लिहिलं की सर...
बॉस - अरे गाढवा, ह्यात किती चुका आहेत... पाठवण्यापूर्वी मला दाखवायला काय धाड भरली होती?
तुम्ही -(तुम्हाला घाम फुटायला सुरुवात होते) सर हे तयार करता करता फार उशीर झाला, तुम्ही तोवर निघाला होतात.
बॉस - मग सकाळी दाखवायचं...
तुम्ही -सर ते कालच पाठवायचं होतं म्हणून पाठवलं. आय एम सॉरी...
बॉस - तुझ्या सॉरीचं काय लोणचं घालू?
(तुम्हाला थोडं भिरभिरल्यासारखं होतं)
बॉस - ही तुझ्या हातून झालेली शेवटची चूक. ह्यापुढे अजून एक जरी चूक झाली तरी तो तुझा ह्या कंपनीतला शेवटचा दिवस असेल.

बॉस असा ताणताणताणताण बोलत असताना इथे तुमच्या डोक्यात भुंगा सुरू होतो. नोकरी जाणार ह्या विचारासोबत डोळ्यासमोर होम लोनचे हफ्ते, गाडीचे हफ्ते, ट्रिपची तयारी, मुलांच्या फिया, सिगारेटचे सतत वाढणारे दर ह्या गोष्टी फेर धरून नाचू लागतात आणि तुम्हाला अंधारी येते. चक्कर येऊन तुम्ही किबोर्डवर कोसळता.

बॉस - नॉनसेन्स, ह्या किबोर्डचा खर्च तुझ्या पगारातून कापला जाईल.

-----------------------------------------------------------------------------------------------------

घटना १ - निर्लज्ज दॄष्टीकोन

स्थळ - अर्थातच ऑफिस

वेळ - ऑर्कूट, फेसबूक, ट्विटर, सॉलिटेअर हे सगळे सोबत असताना किती वाजले ह्याकडे कोण लक्ष देतो? २० मिनिटांपूर्वी पिझ्झा आलाय. ती शेवटची ऑर्डर होती. म्हणजे साधारण १२ वाजले असावेत.

पार्श्वभूमी - तुम्ही नेहमीप्रमाणे असंख्य चुका केल्याने बॉसला वरून दट्ट्या मिळालाय. तोच दट्ट्या आता बॉस तुमच्याकडे घेऊन येतोय. तुम्ही Alt + Tab वापरून ०.००००००००१ सेकंदात कामाची विंडो उघडता.

बॉस - काय हा मूर्खपणा???
तुम्ही - हो ना... च्यायला ही काय वेळ आहे कामं करायची. चांगलं ए. सी. फुल स्पीड वर टाकून दुलई ओढून झोपण्याऐवजी आम्ही बसलोय इथे आकडे खाजवत. बरं, तुम्हाला काय झालं?
बॉस - काय झालं म्हणून काय विचारताय... डोक्यात मेंदू आहे की गुंतवळ?
तुम्ही - तुम्ही जो पगार देता त्या पगारात गुंतवळच सापडणार डोक्यात... मेंदू हवा असेल तर जरा कंपनीला सांगा पगार वाढवायला. (गायतोंडे साब) इतने पगार में घर नहीं चलता, दिमाग क्या चलेगा.
बॉस - तुला नोकरी दिली हीच माझी चूक झाली...
तुम्ही - अजून एक चूक झाली. मला काम दिलंत. हॅ हॅ हॅ....
बॉस - हॅ हॅ हॅ करून हसतोयस काय निर्लज्जासारखा. ह्या प्रेझेंटेशन मधे किती चुका आहेत... पाठवण्यापूर्वी मला का नाही दाखवलं?
तुम्ही - त्यासाठी ऑफिस मधे असावं लागतं. तुम्ही डिनरला उशीर होईल म्हणून ८ ला पळता घरी आणि आमची टीम मरतेय इथे रात्री २-२ वाजेपर्यंत. हे फार होतंय. मी मॅटर एस्कलेट करेन.
(बॉसला घाम फुटायला सुरूवात होते )
बॉस - आज थांबलोय ना मी?
तुम्ही - आज कशाला थांबलात? दांडिया खेळायला? काम काल होतं, काल थांबायचंत.
बॉस - रात्री नाही तर निदान सकाळी तरी दाखवायचं
तुम्ही - रात्री ३ च्या पुढे घरी गेल्यावर मी पुन्हा सकाळी लवकर ऑफिसला येऊ? जमणार नाही. तुमच्या अपेक्षा आम्हाला मिळणार्‍या पगाराइतक्याच ठेवल्यात तर बरं होईल...
(बॉसला थोडं भिरभिरल्यासारखं होतं. बॉस फारच भेदरला असेल तर आडलीच्या भाषेत "ज्यादा बोलियाचं काम नाय" असंही बोलून घ्या.)
तुम्ही - हे बघा, आज असं बोललात, पुन्हा बोलू नका. तुम्हाला माहिती आहे की माझी टीम निश प्रोजेक्टवर काम करते. ३ महिन्यानी रिलीज आहे. सगळ्या कोड फाईल्स आणि सोर्स कोड्स आमच्याकडे आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे आम्हाला 'क्ष' कंपनीकडून दुप्पट पगाराची ओपन ऑफर आहे. एकाच वेळी ८ च्या ८ जणं सोडून जाऊ आणि जाताना क्लायंट पण घेऊन जाऊ. तुम्हाला काय वाटलं बॉस आहात म्हणून काय गुलाम झालो आम्ही तुमचे?

तुम्हाला असे निर्लज्जपणे ताणताणताणताण बोलताना पाहून इथे बॉसच्या डोक्यात भुंगा सुरू. अख्खीच्या अख्खी टीम सोडून जाणार आणि सोबत क्लायंटपण नेणार ह्या विचारासोबत बॉसच्या डोळ्यासमोर परफॉर्मन्स रिव्ह्यू, ऑफशोअरचा चान्स, रिटेन्शन बोनस, त्याच्या होम लोनचे हफ्ते, गाडीचे हफ्ते ह्या गोष्टी फेर धरून नाचू लागतात आणि त्याला अंधारी येते. चक्कर येऊन तो तुमच्या किबोर्डवर कोसळतो.

तुम्ही - मोडलास किबोर्ड. मोड तिज्यायला... माझ्या बापाचं काय जातंय.

(तुम्ही लगेच मोबाईलवरून फेसबूकचं स्टेटस अपडेट करता "बॉसला झीट आणली". तुम्हाला दुसर्‍या क्षणी कंपनीतल्या लोकांकडून अभिनंदनाचे १७६० मेसेजेस येतात.)

घटना १ समाप्त
बघितलंत? आपला दॄष्टीकोन थोडासा बदलल्याने आपण कसे सुखात आणि निश्चिंतपणे जगू शकतो. निर्लज्जपणाच्या एक दगडात तुम्ही किती पक्षी मारलेत? बॉसला गप्प केलंत, लवकर निघायची सोय केलीत, पगार वाढवायची सोय केलीत, स्वतःच महत्त्व वाढवलं. म्हणून म्हणतो "निर्लज्ज व्हा. सुखी व्हा