Saturday, November 10, 2012

Uncha maajha zoka lyrics उंच उंच माझा झोका


चांदणचाहूल होती कोवळ्या पाउली
माप मी ओलांडले अन् दूर गेली भातुकली
खेळण्याचे होते वय, अंगणाची होती सय
सोवळ्या मनात माझ्या भरे नभाचा आशय

थबकले उंबऱ्यात मी पाहुनी नवी पहाट
जणू जन्मले नव्याने भरता हा मळवट
हाती अमृताचा वसा, साथ देई माझा सखा
त्याच्या कृतार्थ डोळ्यांत, झुले उंच माझा झोका
उंच उंच माझा झोका, झुले उंच माझा झोका

दाटुनिया येता मेघ भरे आकाश ओंजळ
माळ ही व्रताची जपता झाले घराचे देऊळ
झिजे पायरी होऊन जन्म चंदनासारखा
त्याच्या कृतार्थ डोळ्यांत, झुले उंच माझा झोका
उंच उंच माझा झोका, झुले उंच माझा झोका

चांदणचाहूल होती कोवळ्या पाउली
माप मी ओलांडले अन् दूर गेली भातुकली

आरतीत तेवे माझ्या मंद ह्या व्रताची समई
तुळशीचे रोप माझे उंच आभाळात जाई
मीच ओलांडले मला, सोबतीस माझा सखा
येई कवेत आकाश, झुले उंच माझा झोका
त्याच्या कृतार्थ डोळ्यांत, झुले उंच माझा झोका

असे आगळे हे नाते ऐक ही रमा सांगते
बीज हे रुजे अंतरी, जगण्याचे फूल होते
अशा संसार गाण्याला त्याचा-माझा एक ठेका
त्याच्या कृतार्थ डोळ्यांत, झुले उंच माझा झोका
उंच उंच माझा झोका, झुले उंच माझा झोका